जादा दर आकारल्याने मुंबईतील नानावटी रग्णालयावर FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांकडून जादा पैसे उळल्याप्रकरणी मुंबईतील नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, करोनाबाधित एका महिलेवर नानावटीमध्ये उपचार सुरू होते. 13 जूनला या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृत महिलेच्या कुटुंबियाने रुग्णालयाने जास्त शुल्क आकारल्याबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. चौकशीअंती तपासणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले.

महिलेच्या उपचारांसाठी प्रतिदिन पाच पीपीई किट, तीन एन 95 मास्क (उपलब्ध असूनही), ऍस्पिरिन, पॅरासीटामॉल, बी कॉम्प्लेक्स आदी नियमित वापराची औषधे पॅकेजमध्ये समाविष्ठ असूनही त्याचे वेगळे शुल्क आकारले असल्याचे चौकशी निरीक्षकाला निदर्शनास आले. नातेवाईकांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निरीक्षकाने याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार, बिलाच्या संदर्भातील कथित फरकामुळे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील एफआयआरची प्रत आम्हाला अजून प्राप्त झालेली नाही. या प्रकरणामध्ये तपासास आम्ही पूर्ण सहकार्य देऊ, नानावटी सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.