हैदराबादच्या घटनेसंदर्भात शिवसेनेनं लोकसभेत केलं ‘हे’ निवेदन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हैदराबाद बलात्कार प्रकरणी देशात असंतोषाचे वातावरण होते आणि त्या प्रकरणातील आरोपींचे एन्काऊंटर करून त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या एन्काऊंटरमुळे संपूर्ण देश ढवळून निघाला असून अनेक क्षेत्रातील जेष्ठ लोकांनी आणि राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. याचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. अनेक खासदारांनी लोकसभेत आपापली मतं मांडली आहेत.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील आपले मत मांडले आहे. त्यात ते म्हटले की, “हैदराबाद सारख्या घटनांची थेट सुप्रीम कोर्टातच सुनावणी व्हावी” अशी मागणी त्यांनी केली. लोकसभेत बोलताना खासदार सावंत म्हणाले, “महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्यांचे खटले हे थेट सुप्रीम कोर्टात चालवले जावेत यासाठी कायदा होणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याची कायदेशीर प्रक्रिया ही खूपच संथ असून कनिष्ठ न्यायालयापासून सुरु होऊन ती पुढे सुरुच राहते. त्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळण्यास उशीर होतो. असे त्यांनी आपले स्पष्ट मत मांडत लोकसभा अध्यक्षांना आवाहन केले की, असे गुन्हे थेट सुप्रीम कोर्टात चालवण्याबाबत चर्चेसाठी एक समिती नेमावी.” अशा प्रकारे अरविंद सावंत यांनी लोकसभेत आपले मत स्पष्ट केले.