छत्तीसगडमधून आली रोकड; हवालाचे सव्वातीन कोटी जप्त

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

नंदनवन पोलिसांनी रविवारी पहाटे २.३० च्या सुमारास एका डस्टर कारमधून ३ कोटी, २२ लाखांची रोकड जप्त केली. रायपूरहून (छत्तीसगड) एका सराफा व्यावसायीकाने ही रोकड नागपुरातील व्यावसायिकासाठी पाठवली होती. ही रोकड हवालाची असावी, असा  पोलिसांना संशय आहे.

राजेश वामनराव मेंढे (वय ४०, रा. मिनिमातानगर, कळमना) आणि नवनीत गुलाबचंद जैन (वय २९ रा. शांतीनगर, तुलसीनगर जैन मंदीराजवळ) हे दोघे कार चालवत होते. त्यांची चौकशी केली असता ही कार वर्धमाननगरातील प्रशांत केसानी नामक व्यापा-याकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. केसानीला पोलीस ठाण्यात बोलवले असता तो आला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कारची कसून तपासणी केली असता डिक्की आणि चारही सीटच्या पायदानाजवळ विशिष्ट कप्पे बनविल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ते कुलूपबंद असल्यामुळे पोलिसांनी वाहनचालक मेंढे आणि जैन यांच्याकडे चावी मागितली असता त्यांनी ती केसानीकडे असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी केसानीशी संपर्क केला असता केसानी प्रतिसाद देत नव्हता. यानंतर केसानीच्या वतिने नंतर मनिष खंडेलवाल पोलीस ठाण्यात हजर झाला. यानंतर बऱ्याच गोंधळानंतर लॉकरची चावी उपलब्ध करून दिली. पोलिसांनी लॉकर उघडले असता आतमध्ये २ हजार, ५००, २०० आणि शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल दिसले. पंचासमक्ष ही रोकड पोलिसांनी बाहेर काढली.

दरम्यान ,परिमंडळ चारचे उपायुक्त निलेश भरणे यांना ही माहिती कळताच त्यांनी लगेच नंदनवन पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पंच आणि व्हिडीओ कॅमेरे बोलवून ही रक्कम मोजून घेतली. त्यासाठी नोटा मोजण्याचे काही यंत्रही मागवून घेतले होते, ही रक्कम ३ कोटी, २२ लाख, ७२० रुपये एवढी भरली. उपायुक्त निलेश भरणे यांनी इंकम टॅक्स आणि इन्फोर्समेंट डायरेक्टरला ही माहिती देऊन दोन्ही विभागाचा ताफा  ठाण्यात बोलवून घेतला. ही रोकड मॅपल ज्वेलरी प्रा. लि. रायपूरचे संचालक खजान ठक्कर यांनी रायपुरमधून नागपुरात पाठविल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून, प्रशांत केसानी काय करतो, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, ही रोकड हवालाचीच असावी अशी शहरात चर्चा सुरु आहे.