ठाकरे सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय ! जातीवाचक नावं हद्दपार होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आणखी एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये असंख्य लोकवस्त्या आहेत. या वस्त्यांना जातींवरून नावं दिलेली आहेत. मात्र, आता अशा वस्त्यांना असलेली जातींची नावं हद्दपार होणार आहेत, याबाबतचा निर्णय हे ठाकरे सरकार घेणार आहे.

सामाजिक न्याय विभागाने यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव बुधवारी होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवण्यात येणार आहे. याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यात अनेक शहरांमध्ये कुंभारवाडा, तेली पुरा, बारी पुरा, चांभारवाडा, ब्राह्मण आळी, सुतार गल्ली, सोनार वाडा, गवळी चाळ आदी नावं वस्त्यांना दिलेली आहेत. जातीच्या या खुणा पुसून टाकण्याऐवजी त्या वर्षानुवर्षे जपल्या जाताहेत.

विशेष म्हणजे, 21 व्या शतकात या वस्त्यांची सरकारी रेकॉर्डवरील नोंदही तशी आहे. त्यामुळे समाजात जातीय सलोखा, त्याबरोबर एकीची भावना निर्माण होण्यास अडथळा येतोय. मात्र, या निर्णयामुळे आता जाती-पातीमधील वेगळेपणा कायमचा बंद होऊन एकीची भावना वाढणार आहे, असे बोलले जात आहे.

…तर महापुरुषांची नावं देणार

शहरातील विविध जातीवाचक वस्त्यांची नावं हद्दपार करून त्यांना महापुरुषांची नावं देण्यात येतील. अशा वस्त्यांना दिलेली जातीवाचक नावं योग्य नाहीत, असे मत काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. शरद पवार यांच्या मताचा विचार करून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार त्या संबंधिचा प्रस्ताव विभागाने तयार केला आहे. जातीवाचक नावांमुळे त्या वस्त्या विशिष्ट समाजाच्या असल्याचे निदर्शनास येते. आता मात्र या वस्त्यांना महापुरुषांची नावं दिली जाणार आहेत, अशी माहिती मिळतेय. हा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असणार आहे.

याबाबत नगरविकास आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही जारी करणार आहे. राजकारणामध्ये जातीचा वापर करण्यासाठी नेत्यांनीच या जाती ठळक करून ठेवल्याचा आरोपदेखील होत आहे. असे असताना राज्यातील राज्यकर्त्यांनीच ही रेषा आता पुसण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला जाणार आहे.

You might also like