Coronavirus : काय सांगता ! मांजरीला ‘कोरोना’ची ‘लागण’, मालकिणीकडून झाला ‘संसर्ग’ ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम – ‘कोरोना व्हायरसचे जाळे आता पाळीव प्राण्यांमध्येही शिरकाव करीत आहे. हाँगकाँगमध्ये दोन श्वानांना करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर, आता बेल्जियममध्ये एका मांजरीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मांजरीला करोनाची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. बेल्जियमच्या आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे या मांजरीला तिच्या मालकीणीकडून करोनाची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. मानवातून प्राण्यामध्ये व्हायरसचा प्रसार झाल्याची दाट शक्यता येथे वर्तवण्यात येत आहे.

बेल्जियममध्ये एका आठवड्यापूर्वी मांजरीच्या मालकिणीला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर एका आठवड्यानंतर मांजरीलाही व्हायरसची लागण झाली आहे. मांजरीला डायरिया झाला होता आणि ती सतत उलटी करत होती. तिला श्वास घेण्यासही त्रास होत होता. तपासणी केल्यानंतर व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तत्पुर्वी हाँगकाँगमध्ये एका 17 वर्षाच्या पॉमेरियन जातीच्या कुत्र्याला कोरोनाच्या संशयावरुन आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले होते.

14 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवल्यानंतर त्याला काही दिवसांपूर्वी सोडून देण्यात आले. पण, सूटका झाल्यानंतर दोनच दिवसांमध्ये त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या कुत्र्याच्या 60 वर्षीय मालकिणीलाही कोरोनाने ग्रासले होते. त्यानंतर येथे एका दोन वर्षाच्या जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानालाही कोरोनाची लागण झाली आहे.