‘कोरोना’मुळे केटरिंग व्यवसायसुद्धा संकटात, शहर-खेड्यातही कामगारांच्या तुलनेतसुद्धा ऑर्डर्स मिळेनात

पुणे : कोरोना विषाणूने देशभर थैमान घातले आहे. देशभर मागिल दोन महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये दोन महिन्यापासून लग्नसमारंभ, डोहाळे जेवण, मुंज, यात्रा, जत्रा, उत्सव आणि इतरही सार्वजनिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी होती. आता त्यामध्ये बदल करून लग्न समारंभासाठी पन्नास जण उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. तरीसुद्धा केटरर्स व्यावसायिकांचे संकट टळलेले नाही. कारण चार-पाच हजार जेवणाच्या ऑर्डर्स मिळत होत्या, त्यासाठी दीड-दोनशे कामगार काम करत होते. मात्र, आता कामगारांच्या संख्येएवढ्यासुद्धा ऑर्डर्स मिळत नाहीत. कोरोनामुळे फक्त पन्नास मिळणार आहेत. कारण लग्नसोहळ्यासाठी 50, तर दशक्रियाविधीसाठी 20 जणांनाच परवानगी दिली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवसायाला फटका बसला आहे. आता लॉकडाऊनच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात शिथिलता मिळाली असल्याने बाजारात काहीशी आर्थिक उलाढाल सुरू झाली आहे. परंतु, शिथिलता मिळूनही केटर्सच्या व्यावसायिकांना मात्र काहीच दिलासा मिळालेला नाही. मार्च महिन्यापासून लग्न समारंभाच्या हंगामात भरपूर ऑर्डर मिळतात. लग्नाच्या तारखेप्रमाणे कॅटर्सच्या तारखा मिळवण्यासाठी पूर्व नोंदणी करून ठेवावी लागते. मात्र, ऐन लग्नसमारंभामध्येच करोनाचे संकट ओढवले आहे. यंदाचा संपूर्ण हंगाम हातातून गेला आहे. याच हंगामाच्या बळावर मिळालेल्या मिळकतीतून वर्षभर खर्च चालत असतो.

शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर केटरर्स व्यावसायिक आहेत. शिवाय एका कॅटर्सकडे कमीत कमी 20-25 कामगार असतात. मोठा कॅटर्स व्यावसायिक असल्यास त्याची संख्या पाचशेच्यावर असते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सर्व लग्न समारंभाला परवानगी नसल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चाळीस हजाराहून अधिक या व्यवसायाशी निगडित असलेले कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहे. आता पन्नास जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, केवळ पन्नास जणांसाठी कॅटर्स ऑर्डर घेण्यास नकार देत आहेत. कारण यातून त्यांना मिळकतीपेक्षा अधिकचा खर्च लागत आहे. १३० रुपयांपासून ते पाचशे रुपये प्रति थाळी असे केटर्स आकारत असतात. एरवी दोन हजार जणांच्या जेवणाच्या ऑर्डर आल्यास केटर्स व्यावसायिकांना बऱ्यापैकी मिळत होते.

दरम्यान, पन्नास जणांसाठीचा ऑर्डर आता कॅटर्स व्यावसायिक नाकारू लागले आहे. त्यामुळे लग्न सोहळ्याचा स्वयंपाक करण्याचीसुद्धा दुसरीकडे अडचण होत आहे. त्यामुळे अनेक मंडळींनी अनाथाश्रमामध्ये लग्नसोहळा करण्याला प्राधान्य दिले आहे. त्या ठिकाणी असलेली मंडळी स्वयंपाक करून देण्यास तयार होत असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनचा फटका जसा विवाह समारंभ आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांनाही बसला आहे. विवाह समारंभासाठी केटरिंग आणि डेकोरेशनचे व्यवसायदेखील महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. विवाह समारंभ म्हंटलं की सुसज्य स्टेज, सजवलेला मंडप, प्रशस्त मांडलेल्या खुर्च्या आणि स्वादिष्ट जेवण असेच सर्वसाधारण चित्र विवाह सोहळ्यांमध्ये बघायला मिळते. हे सर्व नियोजन घडवून आणण्यासाठी लग्न समारंभात केटर्स आणि डेकोरेटर्स. आपल्याला मिळालेले काम चोखपणे पार पडावे, यासाठी त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते. खर तर या दोन्ही व्यवसायावर अनेक परिवारांचा उदरनिर्वाह देखील अवलंबून असतो.

पाच-दहा जणांच्या उपस्थितीत लग्न
यावर्षी चित्र मात्र पूर्णतः वेगळं आहे. लग्नाचा सिजन सुरू झालाय, मात्र लॉकडाऊनमुळे सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळायचे असल्याने अगदी कमी लोकांमध्ये आणि साध्या पद्धतीने विवाह होत आहेत. अनेक विवाह पुढे ढकलले जात आहेत. त्यामुळे ऐन सिजनमध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनचा मोठा फटका केटरिंग आणि डेकोरेटर्स या दोन्ही व्यवसायांना बसला आहे. दोन्ही व्यवसायिकांचे सामान धूळ खात पडून आहे. सिजनमध्ये कामगार उपयोगी येतील या अपेक्षेने आठ महिने कामगारांना सांभाळले. मात्र, कोरोनामुळे सर्व नियोजन धुळीस मिळाल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

हडपसरमधील केटरर्स विलास क्षीरसागर म्हणाले की, शाळांना उन्हाळ्याची सुटी असते, त्यामुळे लग्न सोहळे एप्रिल-मे महिन्यामध्ये असतात. हा हंगाम आमच्या हातून गेला आहे. त्यामुळे मोठी आर्थिक अडचण आहे. पुढील वर्षांची वाट पाहण्याची वेळ आली असून, या व्यवसायाशी निगडित पाच हजार केटर्स व त्यांच्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. केवळ पन्नास नागरिकांच्या उपस्थितीत लग्न आणि त्याच्या जेवणाचे ऑर्डर घेणे परवडणारे नाही.