अखेर अडीच तासांनंतर बिबट्या जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंढव्यात सोमवारी भल्या सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंढव्यातील बांधकाम सुरु असलेल्या व्हर्टीकल ओऱीला या १४ मजली इमारतीमध्ये बिबट्या घुसला असल्याची माहिती सकाळी नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. बिबट्या इमारतीच्या डक्टमध्ये पडला असल्याचेही समजते. बिबट्य़ाच्या हल्ल्यात सकाळी दोनजण जखमी झाल्याचे समजते. वनविभाग आणि अग्निशमन दलाचे अधिकारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दाखल झाले. अडीच तासाच्या शोधानंतर अखेर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.

बिबट्याच्या हल्यातील जखमी महिला

पुण्यात भल्या सकाळी बिबट्याचा धुमाकूळ

मुंढव्यातील केशवनगर परिसरात असलेल्या रेणूका माता मंदिरासमोरील व्हर्टीकल ओऱीला नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या परिसरात सोमवारी सकाळी नागरिकांना बिबट्या दिसला. यावेळी बिबट्याने एका सात वर्षाच्या मुलाला पकडले होते. त्याला सोडविताना आणखी काही जण जखमी झाल्याचे समजते आहे. अग्निशमन दल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी या इमारतीमध्ये दाखल झाले. त्यांच्याकडून बिबट्याचा शोध सुरु झाला. इमारतीच्या आजुबाजूला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. वनविभाग अग्निशमन दल यांच्याकडून शोध सुरु असताना. वन विभागाचे एक पथक जाळी घेऊन इमारतीमध्ये गेले होते. तर अग्निशमनच्या दोन पथकांनी दोन जाळ्या बाहेर लावल्या होत्या. बिबट्या अचानक पार्कींगमधून बाहेर आला. त्यावेळी त्याने वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. त्यात तो कर्मचारी जखमी झाला आहे. त्यानंतर लगेचच बाहेरच्या जाळीत पकडण्यात यश आले. त्यानंतर बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत वन विभागाचे अधिकारी घेऊन गेले आहेत.  तो बिबट्या अडीच तासानंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. अग्निशमन दल, वनविभाग, कात्रज टिमने जाळी टाकून बिबट्याला पकडले.

मागील काही दिवसात शहरांमध्ये वन्य प्राण्यांक़डून घुसखोरी केल्याच्या घटना समोर येत आहेत. तीन ते चार दिवसांपुर्वी एनडीए परिसरात नागरिकांनी बिबट्याचे दर्शन झाल्याचे वृत्त आले होते. परंतु वनविभागाला बिबट्या अद्यापपर्यंत परिसरात सापडला नाही. त्यानंतर आता मुंढव्यात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.