उत्तराखंड हिमकडा दुर्घटनेचे कारण आलं समोर; वाचा कशामुळे झालं सर्व

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरातील रैनी गावात वीज प्रकल्पात हिमकडा काल (रविवार) कोसळला. त्यामुळे धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली. या दुर्घटनेत शेकडो लोक वाहून गेले. आता या दुर्घटनेचे कारण समोर आले आहे.

ऋषिगंगा कॅचमेंट एरियामध्ये ही दुर्घटना हिमस्खलनामुळे घडली. भारतीय शास्त्रज्ञांनी सॅटेलाईट डाटाच्या माध्यमातून हा निष्कर्ष काढला आहे. या भागात पडलेल्या बर्फासह भाग घसरला, ज्यामध्ये मोठ्या हिमस्खलनाचे रुप घेतले. त्यामुळे लाखो मेट्रिक टन बर्फ आणि पर्वताचा काही भाग खाली कोसळला. त्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली. याबाबत मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी सांगितले, की ऋषिगंगा येथे आलेला पूर हिमस्खलनामुळे आला. इस्त्रोच्या सॅटेलाईटच्या फोटोच्या आधारे ही माहिती दिली जात आहे. ऋषिगंगा कॅचमेंट एरियामध्ये रविवारी हिमकडा (ग्लेशियर) तुटला नाही. तसेच बर्फवृष्टीत कच्च्या बर्फामुळे एका पर्वताच्या डोंगर माथ्यावर हिमकडे सरकले. पण ज्या ठिकाणी हिमस्खलन झाले तिथे हिमकडे नव्हते.

दरम्यान, आत्तापर्यंत 18 मृतदेह काढण्यात आले असून, अजूनही 202 लोक बेपत्ता आहेत. दीड दिवस उलटूनही सुरुंगात 30 ते 35 कामगार अडकले आहेत. लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफचे जवान बचावकार्य करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

अमेरिकेच्या सॅटेलाईटचा डाटाही घेतला

चमोली येथे आलेल्या आपत्तीचे कारण शोधले जात आहे. त्यासाठी अमेरिकेच्या सॅटेलाईटचा डाटाही तपासला असून, विविध फोटोंच्या आधारे ही दुर्घटना हिमस्खलनामुळे झाल्याचे सांगितले जात आहे.