SSR Death Case : आदित्य ठाकरेंचं नाव नाही, तपास CBI कडे गेलाय – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नाही. तसेच या प्रकरणात त्यांचं नाव कुणीही कधीही घेतलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयात कुणी कुणाचं नाव घेऊ शकतो. बड्या लोकांची नावं घेतल्याशिवाय प्रकरणाला सनसनाटी मिळत नाही. असे सांगतानाच तांत्रिकदृष्ट्या हे प्रकरण सीबीआयकडे गेल्याचा खुलासा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आदित्य ठाकरे यांचा सुशांत प्रकरणाशी कसलाही संबंध नाही. कोणीही त्यांचं नाव घेतलेलं नाही. तुम्ही मीडियावालेच या प्रकरणात आदित्य यांचे नाव घेता. सध्याची पत्रकारिता कोणत्या व कशा पद्धतीने सुरु आहे हे सर्वजण पाहत आहात. सर्वोच्च न्यायालयात कोणीही कोणाचं नाव घेत त्याशिवाय त्या प्रकरणाला सनसनाटी व प्रसिद्धी मिळत नाही. म्हणूनच अशी नावे मीडियाकडून घेतली जातात. तसेच सुशांतला खरोखरच न्याय मिळवून द्यायचं असेल तर सर्वांनी पोलिसांना तपास करुन देण्यासाठी शांत रहावे लागेल, असा सल्ला त्यांनी दिली.

सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे

आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास असून सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे देण्यास आमचा विरोध नाही. पोलिसांकडून जर काही दुवा सुटत असेल तर सीबीआयने जरुर त्याचा तपास करावा. सीबीआयचा काय जगातील कोणत्याही संस्थेने हा तपास करावा, पण आधी पोलिसांना तर तपास करु द्या, असे म्हणत सीबीआय या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासा पलीकडे काही वेगळं करेल असे वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

बिहार सरकारने बेकायदेशीर रित्या शिफारस केल्याने हे प्रकरण आधीच सीबीआयकडे गेले आहे. गुन्हा मुंबईत घडतो.नोंद बिहारमध्ये केला जातो. त्यानंतर बिहार सरकार घाईघाईने हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी करते आणि तेवढ्याच घाईत केंद्र सरकार शिफारस मंजूर करते. हा घटनाक्रम पाहता हे प्रकरण तांत्रिकदृष्ट्या सीबीआयकडे गेले असून, केंद्र सरकार राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण करत आहे. हा विषय राज्याच्या कायदा सुव्यस्थेचा आहे. केंद्राचा नाही. त्यासंदर्भात राज्यसरकारने कोर्टात कॅव्हिट दाखल केल्याचं त्यांनी म्हटलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like