CBI नं व्हिडिओकॉन ग्रुपचे CMD वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध दाखल केला खटला, भ्रष्टाचाराचा आरोप

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) वेणुगोपाल धूत यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सामना करावा लागत असून त्यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. मंगळवारी सीबीआयने त्यांच्याविरुद्ध स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वात असलेल्या बँकांच्या कन्सोर्टियमची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर नोंदविला. सीबीआय सूत्रांनी सांगितले की वेणुगोपाल धूत यांच्यावर आरोप आहे की त्यांनी पूर्व आफ्रिकी देश मोझांबिकमधील आपल्या तेल आणि गॅस कंपन्यांच्या फायनान्सिंगमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वात असलेल्या कन्सोर्टियमच्या काही अधिकाऱ्यांसोबत मिळून हेराफेरी केली. तेल मंत्रालयाच्या तक्रारीनंतर वेणुगोपाल धूत यांच्यावर सीबीआयने कठोर कारवाई केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सीबीआयच्या चौकशीत व्हिडिओकॉन मोझांबिक रोव्होमा लिमिटेडचे संचालक आणि प्रवर्तकही सामील झाले आहेत. सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, व्हिडिओकॉनशी संबंधित कंपन्यांनी बँकांच्या कन्सोर्टियममध्ये अवाजवी नफ्यासाठी संगनमत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर, ओएनजीसी विदेश लिमिटेड आणि ऑईल इंडिया लिमिटेडने जानेवारी 2014 मध्ये व्हिडिओकॉनची मोझांबिक मालमत्ता 25 मिलियन अमेरिकन डॉलर्समध्ये संपादन केली.

वेणुगोपाल धूत हे एम-एस व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड आणि व्हिडिओकॉन हायड्रोकार्बन होल्डिंग लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. व्हिडिओकॉनला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून 3,250 कोटींचे कर्ज मिळाले होते. व्हिडीओकॉन समूहाने एसबीआयच्या नेतृत्वात 20 बँकांकडून घेतलेल्या एकूण 40 हजार कोटी रुपयांचे हे कर्ज होते. आयसीआयसीआय बँकेने 2012 मध्ये दीपक कोचर यांना 3250 कोटींचे कर्ज दिले होते. कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यांनंतर धूत यांच्या कंपनीने आयसीआयसीआय बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत अनेक कोटींची गुंतवणूक केली. कंपनीने ज्या प्रमोटर्समध्ये गुंतवणूक केली त्यापैकी चंदा कोचर यांचे वडील आणि इतर दोन संबंधित प्रमोटर्स होते.