‘CBI’ चे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या चौकशीचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉक्टरांना धमकावून त्याच्याकडून 50 लाख उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

राकेश अस्थाना यांच्यासह चंदीगडचे माजी पोलीस महानिरीक्षक तेजिंदर सिंह लुथरा आणि पोलीस उपअधीक्षक सतीश कुमार यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय पोलीस निरीक्षक अश्वनी कुमार यांच्या चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. या संबंधित अधिकाऱ्यांवर आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे मुख्य अधिकारी आणि सल्लागार मनोज परिदा यांनी हे चौकशीचे आदेश दिले आहेत.

चंदीगड येथील डॉक्टर मोहित दिवाण यांनी सप्टेंबर 2019 मध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या संचालकांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपासात अस्थाना यांना पैसे दिले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दिवाण यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले, त्यानुसार ही चौकशी होणार आहे.

तसे पाहायला गेले तरी आस्थाना यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. याआधी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक आलोक कुमार आणि त्यांच्यात झालेल्या वादाने अस्थाना चर्चेत आले होते. तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला दाखल केला होता.

काय आहे प्रकरण –
डॉक्टर मोहित दिवाण यांनी आरोप केला आहे की राकेश अस्थाना यांच्या सांगण्यावरुन डीजीपी लुथरा यांनी 50 लाख रुपये उकळले. त्यांना एका परदेशी रुग्णाला हे पैसे द्यायचे होते. त्यासाठी सतिश कुमार आणि अश्वनी कुमार यांनी डॉक्टर दिवाण यांच्यावर दबाव आणला. त्यांच्या निवासस्थानी पोलीस पाठवण्यात आले. त्यांना मुख्यालयात नेऊन धमकवण्याचा प्रकार देखील घडला असेही दिवाण यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/