CBI नं जारी केलं माजी खा.अतीक अहमदांचा मुलगा उमरचं ‘पोस्टर’, 2 लाखाचं बक्षीस ‘जाहीर’

प्रयागराज : पोलीसनामा ऑनलाइन – सीबीआयने माजी बाहुबली खासदार अतीक अहमदचा मुलगा उमर याचे पोस्टर जारी करून त्याच्यावर दोन लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. लखनऊच्या व्यवसायिकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात सीबीआय मोहम्मद उमरचा शोध घेत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मोहम्मद उमर फरार आहे. व्यवसायिकाला मारहाण केल्याप्रकरणी मोहम्मद उमरवर एफआयआर नोंदवला आहे. सुप्रीम कोर्टाने उमरच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.

कोण आहे मोहम्मद उमर
यापूर्वी बुधवारी सीबीआयच्या पथकाने उमरचा शोध घेण्यासाठी प्रयागराजमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. मोहित जायसवाल यांनी डिसेंबर 2018 मध्ये लखनऊच्या कृष्णानगर पोलीस ठाण्यात माजी खासदार अतीक अहमद, त्याचा मुलगा उमर, फारूक, जकी अहमद, जफर उल्लाह, गुलाब सरवर इत्यादींच्या विरूद्ध लूटमार, गुंडा टॅक्स वसूल करणे आणि अन्य गंभीर कलमांतर्गत एफआयआर दाखल केली होती.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर सीबीआयने 12 जून, 2019 ला माफिया डॉन अतीक अहमद आणि त्याचा मुलगा उमरसह अन्य आरोपींच्या विरोधात केस दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरूनच अतीक अहमदला उत्तर प्रदेशातून देविरया कारागृहातून गुजरात कारागृहात पाठवण्यात आले होते. सध्या अतीक अहमद अहमदाबादच्या मध्यवर्ती कारागृहात आहे.