PPE किट घालून CBI च्या अधिकार्‍यांची माजी गृहमंत्री देशमुखांच्या घरात एन्ट्री, ताब्यात घेण्याच्या चर्चेला उधाण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या आरोपाची चौकशी सध्या सीबीआय करीत आहेत. या प्रकरणात आज सीबीआयच्या अधिकार्‍यांनी नागपूरमधील सीताबर्डी परिसरातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पीपीई किट घालून प्रवेश केला.
सीबीआयच्या विविध पथकांनी आज मुंबई, नागपूर सह विविध ठिकाणी आज सकाळपासून छापेमारी सुरु केली़. त्यात सीबीआयच्या पोलीस महानिरीक्षक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे तीन वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी अशा १० जणांनी आज सकाळी ७ वाजता अनिल देशमुख यांच्या घरी प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी पीपीई किट घातले होते. त्यांनी घरामधील सर्वांना एका ठिकाणी थांबायला सांगून घरात झडती घेण्यास सुरुवात केली.

अशा प्रकारे कारवाई करणार असल्याची कोणतीही माहिती सीबीआयकडून स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात आली नव्हती. बातम्या ऐकून सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने अनिल देशमुख यांच्या घरी पोहचले.
दरम्यान, अनिल देशमुख नेमके कोठे आहेत, याचा पत्ता लागत नसून त्यांचा मोबाईलही बंद असल्याचे आढळून येत आहे. सीबीआयची छापेमारी पूर्ण झाल्यानंतर ते अनिल देशमुख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे पुन्हा चौकशी करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.