CBI ने स्वत:च्याच मुख्यालयावर टाकली धाड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्या केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाला (सीबीआय) भले भले घाबरतात, त्या सीबीआयने शुक्रवारी (दि.15) सकाळी दिल्लीतील आपल्याच मुख्यालयावर धाड टाकल्याचे समोर आले आहे. CBI च्या एका पथकाने सकाळी दिल्लीतील आपल्या मुख्यालयात तपासणी केली. आपल्या काही अधिकाऱ्यानी लाच घेतल्याचा संशय CBI ला असल्याने ही कारवाई केली आहे. दरम्यान, आज सकाळी सीबीआयकडून दिल्ली, गाझियाबादसह अनेक ठिकाणीं छापेमारी करण्यात आली आहे.

आज सकाळी CBI ने गाझियाबादमध्ये आपल्या एका अधिकाऱ्याच्या परिसरावर छापा टाकला. हा अधिकारी सध्या सीबीआय अकादमीत तैनात आहे. या प्रकरणी डीएसपी रँकचे अधिकारी असलेल्या आर.के. ऋषी यांच्यासह चार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या चार अधिकाऱ्यांमध्ये आर.के. सांगवान आणि बीएसएसफसीच्या 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पदाचा दुरुपयोग आणि भ्रष्टाराच्या एका प्रकरणात या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या अधिकाऱ्यांनी बँक फ्रॉड प्रकरणातील आरोपी कंपन्यांना मदत पोहोचवल्याचा आरोप आहे. एजन्सीने काही अधिवक्ते आणि अज्ञात व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या युनिटकडून सीबीआयच्या एका परिसराचा तपास करण्यात आला. सीबीआयचे प्रवक्ते आरसी जोशी यांनी सांगितले की, गुरुवारी दिल्ली, गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम, मीरत आणि कानपूर अशा 14 ठिकाणी छापेमारी करण्यात आली.