ICICI घोटाळ्याप्रकरणी चंदा कोचर यांच्यावर एफआयआर दाखल ;

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – आयसीआयसीआय बँकेच्या माजी कार्यकारी संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांच्यावर व्हिडिओकॉन समूहाला कर्ज देताना मेहेरनजर दाखवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने एफआयआर नोंदवले आहे. त्यानंतर सीबीआयने महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद येथील काही कार्यालयांमध्ये छापे मारले आहेत.

सीबीआयने व्हिडिओकॉन ग्रुप व चंदा कोचर यांच्यावर कर्ज अनियमितता प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. मुंबईतील व्हिडिओकॉन मुख्यालय, नरिमन पॉईंट, मेकर चेंबर्स, बीकेसी या ४ ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी सुरू आहे, अशी माहिती सीबीआयच्या सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर नूपॉवरचे अध्यक्ष आहेत. या कंपनीमध्ये व्हिडिओकॉनची गुंतवणूक आहे. कोचर यानी पदावर असताना व्हिडिओकॉन आणि नूपॉवर कंपनीला २०१२ मध्ये ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. या प्रकरणी सीबीआयने नूपॉवरच्या कार्यालयांत छापे मारले आहे.

कर्ज घोटाळ्यात अडकलेल्या चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता. कोचर यांना सगळ्या सहयोगी कंपन्यांमधून पदमुक्त करण्यात आले आहे. आता आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या जागी संदीप बक्शी यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असेल.