CBSE Board Exam Update : CBSE च्या 10 वी, 12 वी बोर्ड परीक्षेबाबत शिक्षण मंत्र्यांनी दिली ‘ही’ मोठी माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीएसईच्या 10 वी, 12 वीची बोर्ड परीक्षा 4 मेपासून सुरू होईल आणि 10 जूनपर्यंत चालेल. यासोबतच प्रॅक्टिकल परीक्षा 1 मार्चपासून सुरू होतील. शिक्षणमंत्र्यांनी नुकतीची बोर्ड परीक्षेच्या तारखांची घोषणा केली होती. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सोमवारी म्हटले की, विद्यार्थ्यांना केवळ आपली सीबीएसई बोर्ड परीक्षा आणि सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रम 2021 वर आधारित अन्य परीक्षांसाठी सुधारित अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा लागेल. जेईई आणि नीट सारख्या स्पर्धा परिक्षांमध्ये सुद्धा केवळ तोच भाग असेल.

शिक्षणमंत्र्यांनी आज केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी लाइव्ह संवाद साधला. केंद्रीय विद्यालयाचे हजारो विद्यार्थी आणि शिक्षक या लाइव्ह वेबिनारमध्ये सहभागी झाले. या दरम्यान शिक्षण मंत्र्यांनी केंद्रीय विद्यालये पुन्हा उघडण्याबाबत सूतोवाच केले. त्यांनी म्हटले की, सरकार एकावेळी एक वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय विद्यालय टप्प्याटप्प्याने उघडण्याचा विचार करत आहे. शिक्षणमंत्री म्हणाले, ऑनलाइन अणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांमध्ये वर्ग चालवले जातील.

आपल्या संबोधनादरम्यान शिक्षण मंत्र्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्याच्या टिप्स सुद्धा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना योग करण्याचा सल्ला सुद्धा दिला. ते म्हणाले की, अचानक आलेल्या कोविड-19 महामारीमुळे आपण सर्वांनी अनेक अडचणींचा सामना केला आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वताला, आपले कुटुंब आणि शेजारी यांचे रक्षण करून या महामारीला तोंड द्यावे लागेल.

शिक्षणमंत्र्यांनी बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा करताना म्हटले होते की, सीबीएसई बोर्ड परीक्षा कमी अभ्यासक्रमावर आयोजित केल्या जातील. एकुण अभ्यासक्रमात 30% ची कपात केली गेली आहे आणि काही राज्यांनी सुद्धा अशाप्रकारच्या पावलांची घोषणा केली आहे, इतरांकडून सुद्धा याची अपेक्षा आहे. पोखरियाल म्हणाले होते की, परीक्षेत 33% आंतरिक पर्याय सुद्धा असतील.