CBSE ची 10 वी, 12 वी ची 1 ते 15 जुलैपर्यंत होणारी परीक्षा रद्द !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे सीबीएसईने १ ते १५ जुलै दरम्यान दहावी आणि बारावीच्या होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान मंडळाने सर्वोच्च न्यायालयाला आपल्या निर्णयाची माहिती दिली. सीबीएसई बोर्डाची प्रलंबित परीक्षा १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत घेतली जाणार होती. परंतु काही पालकांनी परीक्षा रद्द करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यानंतर कोर्टाने सीबीएसईला विचारले की परीक्षा रद्द करता येऊ शकते का? यानंतर आता बोर्डाने आपले उत्तर दाखल करत दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल कोर्टाला माहिती दिली. जर परिस्थिती सामान्य असेल, तर बारावीची परीक्षा घेतली जाऊ शकते.

महत्वाच्या बाबी
दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडूने परीक्षा घेण्यात असमर्थता दर्शवली होती.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मागील तीन परीक्षांच्या आधारे मूल्यांकन केले जाईल.
नंतर परिस्थिती सामान्य झाल्यास परीक्षा आयोजित करण्याचा पर्याय असेल.

आता हा पर्याय
ज्या विषयांसाठी परीक्षा घेतली जाणार होती, त्या विषयात अंतर्गत मूल्यांकनानुसार सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना बढती दिली जाऊ शकते. याशिवाय संबंधित विषयातील गुण सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा देण्याचा पर्यायही मिळू शकतो.

जुलैमध्ये निकालाची अपेक्षा वाढली
अशा परिस्थितीत जेव्हा सीबीएसई बोर्डाने दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाच आहे, तेव्हा लवकरच विद्यार्थ्यांमध्ये निकालाची अपेक्षा देखील वाढली आहे. खरतर सीबीएसई बोर्डाने लॉकडाऊन होण्यापूर्वीच झालेल्या पेपरच्या प्रतींचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू केले होते. आता उर्वरित परीक्षा रद्द झाल्या आहेत, तर बोर्ड जुलै अखेरपर्यंत निकाल जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी १२ वीच्या परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला होता, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ६ मे रोजी आला होता.

२९ विषयांसाठी परीक्षा होणार होती
वास्तविक देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच सीबीएसई परीक्षा सुरू झाल्या होत्या. मात्र लॉकडाऊननंतर काही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर निर्णय घेण्यात आला की, दहावी आणि बारावीच्या २९ मूळ विषयांच्या परीक्षा १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत घेण्यात येतील. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यासाठी माहितीपत्रकही जाहीर केले होते. त्याअंतर्गत दहावीची परीक्षा फक्त उत्तर-पूर्व दिल्लीच्या भागात घेण्यात येणार होती, जेथे हिंसाचारामुळे परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या. त्याचबरोबर देशभरात बारावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे लक्षात घेता या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.