दुबईतून सोन्याची तस्करी करणार्‍या चौघांना अटक, 3 किलो सोने जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुबईहून तब्बल 3 किलो सोन्याची तस्करी करणा-या चौघांना रविवारी (दि. 14) कस्टम विभागाने अटक केली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने ही कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास दीड कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. तस्करांनी सोन्याची पेस्ट करून ती अंडरविअरच्या बेल्टमध्ये लपवली होती.

सोने तस्करांनी दुबईहून विमान FX 8325, SG 138 AI चे विमान AI 1930 च्या माध्यमातून लखनौच्या विमानतळावर पोहचले होते. चौघांची तपासणी केली असता एकूण 3 किलो सोने आढळून आले. त्यांच्याकडे यासंबधीची काही कागदपत्रेही नसल्याने सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत 1 कोटी 49 लाख 10 हजार रुपये इतकी आहे. कस्टम डेप्युटी कमिश्नर निहारिका लाखा यांनी सांगितले की, सोन्याची तस्करी करणा-या चौघांनी जीन्सखाली दोन अंडरविअर घातल्या होत्या. संशय आल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता सोने सापडले. सीमा शुल्क उपायुक्तांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या सोन्याबाबत चौघांकडेही विचारणा केली. पण ते काहीच उत्तर देत नाहीत. चौघांच्या कनेक्शनबाबत तपास सुरू आहे. तसेच चौघांनी वेगवेगळी फ्लाइट का घेतली याचीही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.