काळजाचा थरकाप उडवणाऱ्या ‘त्या’ घटनेने रेल्वेस्थानकात गोंधळ, सीसीटीव्हीत कैद

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाईन – देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण प्रचलित आहे. परंतु हीच म्हण आता प्रत्यक्षात खरी झाल्याचंं दिसत आहे. एक काळजाचा थरकाप उडावा अशी घटना समोर आली आहे. या घटनेतून ही महिला सुखरुप बचावली आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात घडलेली ही घटना आहे. विशेष म्हणजे,  ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचंही समजत आहे. कमल शिंदे असं या घटनेतून बचावलेल्या महिलेचं नाव आहे.
कमल शिंदे या डोंबिवलीतील खंबाळपाड़ा येथील भोईरवाडीत वास्तव्यास आहेत. त्या आपल्या कुटुंबासह तेथे  राहतात. सोमवारी दुपारच्या सुमाराला प्लॅटफॉर्मवर एकटी बसली होती. त्याचवेळी १ वाजून ४५ मिनिटांने एक नंबर फलाटावर लोकल तिच्या समोर आली. यानंतर प्लॅटफाॅर्मवर बसलेल्या कमल शिंदे यांनी अचानक उठून रुळावर धाव घेतली. धक्कादायक म्हणजे त्यांनी स्वत:ला लोकलसमोर झोकून दिले. यानंतर त्यांच्या अंगावरून लोकलचे दोन डबे गेले. तेथे उपस्थित सर्वच ही घटना पाहत होते. अनेकांना श्वास रोखला गेला होता. यामुळे स्थानकात एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
दरम्यान, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात जितेंद्र कुमार, रोहित कुमार हे आरपीएफ जवान तैनात होते. त्यांनी कमल हिला रुळावर उतरताना पाहिले. या घटनेनंतर सदर दोन्ही जवानांनी काही प्रवाशांची मदत घेत कमल शिंदे हिला जिवंत बाहेर काढले. कमल रुळाच्या मध्यभागी दोन स्लीपर्समध्ये पडली होती. यामुळे ती या अपघातातून थोडक्यात बचावली. या घटनेबाबत माहिती देताना, कमल ही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आरपीएफ सूत्रांनी दिली आहे. मुख्य म्हणजे, तिने आत्महत्या करण्यासाठी लोकलसमोर उडी घेतली असल्याचे सांगितले. परंतु त्यांनी याबाबत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास मात्र नकार दिल्याचे दिसून आले.