नागपूरमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला, आरोपींना ठोकल्या बेड्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमध्ये गुन्हेगारांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारांनी आता पोलिसांनाच टार्गेट केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावरच गुन्हेगारांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सप्टेंबरमध्ये घडली असून याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

या घटनेमध्ये पोलीस हवालदार रवींद्र तुळशीराम चौधरी (वय-44 रा. भिलगाव, कामठी) हे जखमी झाले आहेत. चौधरी हे आपले कर्तव्य बजावत असताना अवैध वाळू व्यावसायात सहभागी असलेला सराईत गुन्हेगार कमलेश हरिश्चंद्र मेश्राम याचा भाऊ नितेश मेश्राम याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली होती. त्यानंतर आरोपीच्या भावाकडून आरेरावीची भाषा करण्यात येत असल्याने ठाण्यात आणून रवी चौधरी यांनी त्याला चोप दिलेला होता.

भावावर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाही विरोधात आरोपी कमलेश संतापलेला होता. अशातच आरोपीकडून सूड घेण्याच्या उद्देशाने चौधरी याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. याप्रकरणाच्या तपासादरम्यान चौधरी याच्यावर जिथं हल्ला झाला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.

नागपूर शहरात अवैधपणे व्यवसाय करणाऱ्यांविरोधात अनेक कारवाया करण्यात येत आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया चालू राहणार असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा नागपूर पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. असं करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.