महाराष्ट्राच्या ‘या’ मंत्र्याची टीका; म्हणाले – ‘सचिन तेंडुलकरने कोरोना झाल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला नको होते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  भारताचा म्लास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली होती. म्हणून सचिन रुग्णालयात दाखल झाला होता. या कारणावरून राज्याच्या एका मंत्र्यांनी सचिन तेंडुलकर याच्यावर गंभीर टीका केली आहे. सचिनसारख्या व्यक्तीने तरी असं करायला नको होतं, असे महाविकास आघाडीतील मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

अस्लम शेख म्हणाले, जे सेलिब्रेटी आहेत, ते आपल्या घरामध्येही उपचार घेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी रुग्णालयात येऊन बेड्स अडवू नयेत. सचिन तेंडुलकर किंवा अक्षय कुमारसारखे सेलिब्रेटी हे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते, मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल घेण्याची गरज नाही. तसेच, सध्याच्या घडीला मुंबईमध्ये हॉस्पिटल्सची काय अवस्था आहे, हे सर्वानाच माहिती आहे. त्यामुळे जे गरजू लोकं आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे या गोष्टींचा विचार सेलिब्रेटींनी नक्कीच करायला हवा. असे शेख यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, आताच्या घडीला मुंबईमधील हॉस्पिटल्सची अवस्था अधिक बिकट आहे. कारण हॉस्पिटल्समधील बेड्स संपलेले आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना बेड्स मिळत नसल्याचे बघायला मिळाले. त्याचबरोबर हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन आणि काही औषधांचीही कमतरता जाणवत आहे. त्यामुळे जर सेलिब्रेटींना जर घरातच उपचार घेता येत असतील तर त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊ नये, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलीय. यादरम्यान, सचिन तेंडुलकर हा रोड सेफ्टीसाठी क्रिकेट मालिकेत भारताकडून खेळत होता. ही स्पर्धा भारताने जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघातील अन्य खेळाडूंनाही कोरोना झाला होता. सचिनला करोना झाल्यावर तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता.