दिल्लीसह ‘या’ 9 राज्यात पुन्हा वाढताहेत कोरोना केस, केंद्राने दिले ’टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट’चे निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात पुन्हा एकदा वेग पकडत असलेल्या कोरोना व्हायरसवर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकार अलर्ट आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉक्टर विनोद पॉल यांनी 9 राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक घेतली. या राज्यांमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

वृत्तसंस्था एनआयनुसार, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉक्टर विनोद पॉल यांनी हरियाणा, आंध्र प्रदेश, ओडिसा, गोवा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि चंडीगढच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली. कोविड-19 सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत नॅशनल हेल्थ मिशनचे मिशन डायरेक्टर्ससुद्धा सहभागी झाले. या 9 राज्यांमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे.

याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना व्हायरस महामारीबाबत सुरुवातील घेतलेल्या खबरदारीवर परतण्याचे आवाहन केले. आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ’टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट’च्या पायाभूत व्यवस्थेवर पुन्हा काम करण्यास सुरूवात करावी. केरळ आणि महाराष्ट्राशिवाय देशातील इतर राज्यांमध्ये स्थिती बिघडत चालली आहे.

भारतात एका दिवसात कोरोना व्हायरस संसर्गाने 18,327 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमितांची एकुण संख्या वाढून 1,11,92,088 झाली आहे. देशात 36 दिवसानंतर संसर्गाची ही सर्वाधिक प्रकरणे आहेत आणि यासोबत लागोपाठ चौथ्या दिवशी उपाचाराधीन रूग्णांच्या संख्येत वाढ नोंदली गेली. ही संख्या आता 1,80,304 वर पोहचली आहे. पंजाबच्या जालंधरमध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जारी ठेवला आहे. जालंधरमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रतिबंध जारी राहील.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी जारी आकड्यांनुसार संसर्गाने आणखी 108 लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून 1,57,656 झाली. यापूर्वी 29 जानेवारीला 24 तासात संसर्गाची 18,855 प्रकरणे समोर आली होती. परंतु, यानंतर प्रतिदिन नव्या प्रकरणांची संख्या 18 हजारच्या खाली होती.