लातूर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्राकडून 114 कोटींचा निधी मंजूर

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय रस्ते विकास निधीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील विविध 9 रस्त्यांसाठी तब्बल 114 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील रस्त्यांसाठी हा निधी मंजूर केला आहे.

सध्या लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गचे काम सुरु असून यासाठी आमदार निलंगेकर यांनी पुढाकार घेतला होता. सदर राष्ट्रीय महामार्गचे काम प्रगतीपथावर असून जिल्हाअंतर्गत रस्तेही दर्जेदार व्हावेत, त्यासाठी निधी मिळावा यासाठी निलंगेकरांनी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. खासदार सुधाकर श्रृंगारे यांनाही याबाबत विनंती केली होती. अखेर या दोघांच्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय रस्ते विकास निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्त्यांसाठी 114 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून लातूर तालुक्यातील ढाकणी ते भेटा व सारसा- गाधवड- शिरोळ- बोरगाव (का.)- निवळी, अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर ते बेलूर व घाटनांदूर- अहमदपूर- थोडगा- मोघा या रस्त्यांची कामे होणार आहेत. तसेच औसा तालुक्यातील औसा- याकतपूर- कन्हेरी- जयनगर- किनीथोट- शेडोळ- खरोसा व चिंचोलीराव वाडी- औसा- नागरसोगा- दापेगाव- गुबाळ- सास्तुर तर उदगीर शहरासाठी बिदर रोड ते छत्रपती शिवाजी चौक ह्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. निलंगा तालुक्यातील उजेड- निटूर- लांबोटा- निलंगा- कासारशिरसी- मुळज- तुरोरी हा रस्ता दर्जेदार होणार असून याच तालुक्यातील निटूर-शिरोळ-हेळंब हा रस्ता होणार असून याच रस्त्यावरील गिरकसाळ येथे मांजरा नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामांसाठी आवश्यक असणारा निधी राज्य सरकारकडे हस्तांतरीत केला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.