दिल्लीतील महत्त्वाच्या 2 केंद्रांना सुषमा स्वराज यांचं नाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त दिल्लीमध्ये प्रवासी भारतीय केंद्राला सुषमा स्वराज यांचे नाव देण्यात आले आहे. यासोबत विदेश सेवा संस्थेलाही स्वराज यांचे नाव देण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून काम करत असताना सुषमा स्वराज यांनी खूप काम केले आहे. त्यांचे योगदान लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे उल्लेखनीय योगदान लक्षात घेता केंद्र सरकारने प्रवासी भारतीय केंद्राला आणि विदेश सेवा संस्थेला सुषमा स्वराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. विदेश सेवा संस्थेला, सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ सर्व्हिस असे नाव देण्यात आले आहे. सुषमा स्वराज यांनी अनेक वर्षापासून लोकांची सेवा केली आहे. त्यांचे हे योगदान लक्षात घेवूनच 14 फेब्रुवारीला स्वराज यांच्या जयंतीनिमित्त ही घोषणा करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मंत्रीमंडळातील महत्त्वाचे खाते असलेले परराष्ट्र मंत्रीपद सुषमा स्वराज यांना दिले. परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. यासोबतच ट्विटरच्या माध्यमातून त्या लोकांशी नेहमीच संपर्कात राहिल्या. त्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांची मदत केली आहे. सुषमा स्वराज यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढवली नव्हती. त्यांचा 6 ऑगस्ट 2019 रोजी मृत्यू झाला.