शिजवलेल्या चिकन आणि उकडलेल्या अंड्यापासून ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही, बंदी हटवण्यास केंद्रानं राज्यांना सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनानंतर आता देश बर्ड फ्लूच्या (bird flu ) संसर्गामुळे घाबरलेल्या अवस्थेत आहे. या दरम्यान व्यवस्थित शिजवलेले चिकन व अंडी सुरक्षित असल्याचे आश्वासन देत, केंद्र सरकारने शनिवारी देशभरातील राज्य सरकारांना विनंती केली की त्यांनी पोल्ट्री उत्पादनाच्या विक्रीवरील बंदी उठवावी. त्यासोबतच संसर्गहीन भागात/ राज्यांत पोल्ट्री उत्पादनांच्या विक्रीस परवानगी द्यावी. देशातील केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात हे राज्य बर्ड फ्लूच्या (bird flu ) विळख्यात सापडले आहेत.

मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयाने (एफएएचडी) एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की बर्ड फ्लूच्या प्रसाराबद्दल अवैज्ञानिक अफवांवर लोकांनी लक्ष देऊ नये. मंत्रालयाने म्हटले आहे की या बंदीचा कुक्कुट आणि अंडी बाजारावर विपरित परिणाम झाला आहे आणि यामुळे पोल्ट्री व मका उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे, जे आधीच कोविड -19 साथीच्या आजाराने त्रस्त आहेत.

एफएएचडीने म्हटले आहे की पोल्ट्री आणि पोल्ट्री उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा आणि संसर्गहीन भागात/ राज्यांत पोल्ट्री उत्पादनांच्या विक्रीस परवानगी द्यावी. असे सांगण्यात आले आहे की चांगले शिजवलेले अन्न, चिकन आणि अंडी मानवासाठी सुरक्षित आहे. विशेष म्हणजे बर्ड फ्लूचे बहुतेक स्ट्रेन मानवांवर परिणाम करीत नाहीत. तथापि, हा आजार संक्रमित पक्ष्यांची विष्ठा, नाक, तोंडाद्वारे पसरतो परंतु एकदा पूर्णपणे शिजवल्यास कोंबडी किंवा चिकन डिश खाणे हे सुरक्षित आहे.