दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र आणि अमित शहा जबाबदार : सोनिया गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील हिंसाचार हा पूर्व नियोजित कट असून दिल्लीत उद्भवलेल्या स्थितीला केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून ही जबाबदारी स्विकारत गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. दिल्लीत दंगल उसळल्यानंतर 72 तासापर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कारवाई करणे टाळले. दिल्लीत झालेला हिंसाचार आणि सध्याच्या परिस्थितीला गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधातील आंदोलनांना हिंसक वळण लागून दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत दिल्लीतील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली.

सोनिया गांधी म्हणाल्या, भाजप नेत्यांनी भावना भडकतील अशी भाषणे करत द्वेष पसरवण्याचे काम केले असा थेट आरोप सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपच्या नेत्यांनी दिल्लीतील पोलिसांनी तीन दिवसांची मुदत देत, यानंतर जे काही होईल त्याबद्दल आम्हाला सांगू नका अशी चिथावणीखोर वक्तव्ये केली, असे सांगत या हिंसाचारात 20 पेक्षा अधिक लोकांचे बळी गेल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

दिल्लीतील हिंसाचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकारही तितकीच जबाबदार आहे. शांतता आणि सौदार्ह प्रस्थापित करण्यासाठी दिल्ली सरकारने प्रशासनाला सक्रिय आले नाही. त्यामुळे दिल्लीतील हिंसाचार ही केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित अपयशाचा परिणाम आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.