अल्पावधित लोकप्रिय झालेले Tik Tok अ‍ॅप प्ले स्टोअर मधून होणार डिलीट

बेंगळुरू : वृत्तसंस्था – तरुणाईला वेड लावणारे ‘टिक टॉक’ अ‍ॅप डीलीट करण्याचे निर्देश अखेर सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता खूप कमी कालावधीत लोकप्रिय झालेले टिक टॉक अ‍ॅप लवकरच प्ले स्टोअर मधून नाहीसे होणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाकडून या अ‍ॅप वर आणलेल्या बंदीवर स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारमधील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

टिक टॉक च्या व्हिडीओजने सोशल माडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भारतात काही ठिकाणी या अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लिल मजकूर अपलोड होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ या अ‍ॅपवर बंदी आणण्यासाठी मद्रास हायकोर्टाकडून याचीका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मद्रास हायकोर्टाने अ‍ॅपवर बंदी आणली. या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्यात आले. सुप्रीम कोर्टाने बंदीवर स्थगिती आणण्यास नकार दिला असून पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे.

भारतात टिकटॉकचा धुमाकूळ

पबजी गेमनंतर आता भारतीय तरुणाईला टिक टॉक अ‍ॅप ने अक्षरशः वेड लावले आहे. एका अभ्यासाअंती मागील तीन महिन्यात हे अ‍ॅप प्ले स्टोअर मधून सर्वात जास्त डाउनलोड करण्यात आले आहे. गुगल प्लेस्टोर मधून डाऊनलोड होणाऱ्या अ‍ॅपमध्ये टिकटॉक जगात तिसऱ्या क्रमांकाचे अ‍ॅप ठरले होते.

मार्च तिमाहीत टीक टॉकने १८.८ कोटी नवे युजर्स जोडले होते. त्यापैकी भारतातील ८.८६ टक्के युजर्स होते. मागील वर्षी अ‍ॅपच्या ५० कोटी युजर्सपैकी ३९ टक्क्यांपेक्षा अधिक युजर्स हे भारतातील होते.