Remdesivir वाटपावरून मोदी सरकारचे गुजरातप्रेम उघड; पण महाराष्ट्र…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन : देशभरात कोरोना व्हायरसचे संकट आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. मात्र, याच इंजेक्शनच्या वाटपात मोदी सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे दिसत आहे. तर गुजरातवर विशेष प्रेम दाखवले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता दररोज किमान 60 हजार रेमडेसिव्हिर मिळणे गरजेचे आहे. मात्र, केंद्र सरकारने 21 ते 30 एप्रिल या कालावधीसाठी महाराष्ट्राला केवळ 2 लाख 69 हजार 200 रेमडेसिव्हिरचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ केंद्र सरकारकडून दिवसाला 26 हजार रेमडेसिव्हिर दिली जाणार आहेत. पण गुजरातवर मोदी सरकारचे विशेष प्रेम दिसत आहे. महाराष्ट्रात सध्या 6 लाख 90 हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर गुजरातमध्ये 84 हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. येत्या 10 दिवसांसाठी महाराष्ट्राला दररोज 26 हजार रेमडेसिव्हिर मिळणार आहेत. तर गुजरातला एक लाख 63 हजार 500 रेमडेसिव्हिर देण्यात येणार आहेत.

लसींचा पुरवठा असो, ऑक्सिजन प्लांटचे वाटप किंवा रेमडेसिव्हिरचा पुरवठा केंद्राकडून प्रत्येकवेळी महाराष्ट्राची उपेक्षाच करण्यात आल्याचे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने सांगितले. केंद्राकडून महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वारंवार पथके पाठवली जातात. मात्र, कोणतीही ठोस मदत न करता केवळ महाराष्ट्रावर टीका करण्याचे उद्योग प्राधान्याने होत आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरातील निवडक 19 राज्यांत रेमडेसिव्हिर उत्पादक असलेल्या सात कंपन्यांकडील रेमडेसिव्हिर साठ्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असतानाही केवळ 2 लाख 69 हजार 200 रेमडेसिव्हिर देण्याचा निर्णय झाला तर एक लाख 63 हजार 500 रेमडेसिव्हिर देण्यात येणार आहेत.