PM नरेंद्र मोदींची संसदेत ‘राम मंदिरा’बाबत मोठी ‘घोषणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर ट्रस्टबाबत एक मोठी घोषणा लोकसभेत केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर ट्रस्ट स्थापन करण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाने केला आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक योजना तयार केली असून या ट्रस्टचे नाव श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र असणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या ट्रस्टकडे ६७ एकर जमीन हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना सांगितले की, देशातील करोडो देशवासीयांप्रमाणेच श्रीराम हे माझ्या हदयात आहेत. हे विषय श्रीराम जन्म भूमीशी संबंधित आहे. हे विषय भगवान श्रीराम यांच्या भव्य मंदिराशी जोडलेले आहे. त्याचा निर्णय घेण्याचे व त्यावर बोलणे हे मी माझे सौभाग्य समजतो.

सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर जमीन देण्यासही सांगितले आहे. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला अनुसरुन मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आले. राम मंदिरासाठी बनविण्यात आलेल्या ट्रस्टचे नाव श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र असे असेल. ते स्वतंत्र असेल. आणि श्रीराम जन्मस्थळावर एक भव्य मंदिर बनविण्यासाठी सर्व निर्णय घेण्यास हा ट्रस्ट सक्षम असेल.

आम्ही उत्तर प्रदेश सरकारला अयोध्यात सुन्नी वक्फ बोर्डासाठी ५ एकर जमीन देण्याची शिफारस केली आहे. त्याला उत्तर प्रदेश सरकारने मंजुरी दिली आहे. राम मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची संख्या लक्षात घेता ६७.७ एकर अधिकृत जमीन आहे. त्याच्या आत व बाहेर जे आंगण आहे. ते रामजन्म भूमी तीर्थक्षेत्रामध्ये स्थानांतरित केले जाणार आहे.