केंद्र सरकार महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या मदतीसाठी सकारात्मक : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : केंद्र सरकारकडून साखर उद्योगाला मदती संदर्भात आठवडाभरात निर्णय होणार आहेत. महाराष्ट्रातील साखर उद्योग सध्या अडचणीत आहेत. साखर उद्योगाला मदत करण्याची केंद्र सरकारची भूमिका असुन केंद्र सरकार मदतीसंदर्भात आठवडाभरात निर्णय घेणार असल्याची माहीती राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

नवी दिल्ली येथे गुरुवार (दि.27) रोजी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे शिष्टमंडळाने भेट घेतली. या बैठकीत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारकडून साखर उद्योगाच्या मदती संदर्भात विविध मागण्या करून, सविस्तरपणे चर्चा केली व आपली भूमिका मांडली.तसेच मदती संदर्भातील धोरणात्मक निर्णय लवकर घेतले जावेत, अशी विनंती केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

गेली दोन-तीन वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे आणि उस दर व साखरेची विक्री किंमत यामधील तफावतीमुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांकडील कर्जाचे वन टाइम पुनर्गठन करावे, साखरेचा बफर स्टॉक वाढवून द्यावा, कारखान्यांना साखर निर्यातीचे अनुदान द्यावे, सॉफ्ट लोन उपलब्ध करून द्यावे तसेच सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे अनुदानाचे बेल आऊट पॅकेज द्यावे आदी मागण्या या बैठकीमध्ये केंद्र सरकारकडे करण्यात आल्या. सदरच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक असून निर्णय घेणेसाठी पुढील आठवड्यामध्ये बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मंत्रीमहोदयांनी बैठकीत शिष्टमंडळाला दिली आहे.

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा हे साखर उद्योगाला मदत करण्याच्या मानसिकतेत आहेत, त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी चांगले निर्णय जाहीर होतील,अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. सदरच्या शिष्टमंडळांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील तसेच आ.राहुल कुल, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडीक, पृथ्वीराज देशमुख, कल्याणराव काळे यांचा समावेश होता.