Kolhapur News : केंद्र सरकारनं शेतकर्‍यांना समजून घ्यावं : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीच्या सीमांवर शेतकरी थंडी, वाऱ्याला न जुमानता आंदोलन करत आहे, ही बाब राज्यकर्त्यासाठी नक्कीच भूषणावह नाही. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवायचे असेल तर त्यांना रोजगार द्या, त्यांच्या जमिनी कशाला पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांचे कृषी विषयक धोरण समजून घ्यायचे असेल तर केंद्र सरकारने आधी शेतकऱ्यांना समजून घ्यायला हवे, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले.

कृषी विषयक धोरण आणि दिल्ली सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शाहू महाराज म्हणाले, “कृषी विषयक धोरणात दोष असल्याशिवाय शेतकरी आंदोलन करत नाही. पंजाब हे कृषी उत्पादनाबाबत देशातील अग्रेसर राज्य असून, तेथील शेतकरी आंदोलन करतात. त्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे. मात्र, दुर्दैवाने त्यांच्याशी कोणी चर्चा करण्यास तयार नाही. ज्यांना जबाबदारी घेण्याची गरज आहे ते मुलाखत किंवा पत्रकार परिषद घेण्यास तयार नाही. संवादातून मार्ग निघाला असता.”

“शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी शेतीचा सर्वाथाने विचार केला होता. राधानगरी धरणाच्या ठिकाणी फक्त इलेक्‍ट्रीसिटी उभारण्याचा प्रयत्न होता. मात्र, महाराजांनी धरण आणि इलेक्‍ट्रीसिटी अशी उभारणी केली. सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देत, कृषी अभियांत्रिकीकरणाच्या दिशेने त्यांचे पाऊल पडले. शेतीला पाणी देताना त्यामाध्यमातून रोजगार कसा निर्माण होईल, याकरता त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी समृद्ध झाला तर राज्याची पर्यायाने देशाची समृद्धी होते यावर राजर्षी शाहू महाराजांचा विश्वास होता,” असेही श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सांगितलं.

तरुणांनी व्यायामावर भर द्यावा
तरुणांनी व्यायामावर अधिक भर देण्याची गरज आहे. शरीर तंदुरुस्त असेल तरच मन तंदुरुस्त राहील, असे आवाहनही श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी केले.