केंद्र सरकार सहकार्य करेल; पूरस्थितीबाबत PM नरेंद्र मोदींंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वासन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण राज्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी आर्थिक मदतीची मागणी करू लागला असल्याने नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, या स्थितीचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्याला मदत करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी यासंदर्भात मराठीत ट्विट करत माहिती दिली.

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मी पुन्हा एकदा दिले.

बुधवार, गुरूवारी झालेला वादळीवारा आणि अति जोरदार परतीच्या पावसामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. भीमा व कृष्णा नदीला पूर आल्याने पंढरपूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. लाखो हेक्टरवरील तूर, सोयाबीन व भात पिकाचे मोठे नुकसान झाले.

पाऊस अजून सुरूच असून आणखी चार दिवस असाच कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे 55 हजार हेक्टर पैकी तब्बल 10 हजार हेक्टर क्षेत्राखालील भात पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.