परीक्षेशिवाय इंटर्नशीपला केंद्रीय वैद्यकीय परिषदेचा नकार !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षांविना इंटर्नशिप सुरू करण्यास भारतीय वैद्यकीय परिषदेने नकार दिला आहे. या प्रकरणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.

अंतिम वर्षांत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करावी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच त्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, असे ठरविण्यात आले होते. त्यासाठी भारतीय वैद्यकीय परिषदेकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, परिषदेने त्यास परवानगी नाकारली आहे. या प्रकरणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य सरकार न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडणार आहे.

कोरोनामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतचा संभ्रम कायम असला तरी वैद्यकीयच्या पदव्युत्तरच्या परीक्षा ठरल्यानुसारच होतील, अशी भूमिका महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रतिज्ञात्राद्वारे उच्च न्यायालयात मांडली आहे. आरोग्य विज्ञानाच्या विविध शाखांच्या पदवीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, परिस्थिती सुधारल्यानंतर त्या लगेच घेतल्या जातील, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले.