कॅन्सरग्रस्तांसाठी मध्य रेल्वे ‘सुसाट’, घरपोच औषधे पोहोचवून रुग्णांचे प्राण वाचवले !

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेने मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीच्या साहाय्याने आठपेक्षा जास्त कॅन्सरच्या रुग्णांना घरपोच औषध पोचवली आहेत. ही औषधे मुंबई डिविजनमधून भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचवण्यात आली आहेत. अशाप्रकारे मध्य रेल्वेने कॅन्सरग्रस्तांचे प्राण वाचवले आहेत.

कोरोनामुळे 23 मार्चपासून देशातील रेल्वेसेवा पूर्णतः बंद करण्यात आली होती. मात्र असे असले तरी रेल्वेने मालवाहतूक सुरु ठेवून देशभरात वेगवेगळ्या वस्तूंचा पुरवठा केला होता. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश सर्वात जास्त होता. मात्र प्रवासी वाहतूक बंद असल्याने नागरिकांना रेल्वेच्या पार्सल सेवेचा वापर करुन एका ठिकाणावरुन दुसर्‍या ठिकाणी वस्तू किंवा इतर गोष्टी पोहोचवायला लागत होत्या. याच पार्सल सेवेचा उपयोग करुन कॅन्सरग्रस्तांसाठी आवश्यक असलेली औषधे मध्य रेल्वेने पोहोचवली आहेत. कॅन्सरची काही औषधे ही मुंबईसारख्या मोठ्या शहरात उपलब्ध असतात. त्यातही काही औषधे ही एका विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध असतात. मात्र लॉकडाऊन असल्याने ती औषधे विकत घेण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक हे त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते. अशावेळी मुंबई आणि आसपासच्या शहरातील काही नागरिकांनी मध्य रेल्वेच्या पार्सल सेवेचा वापर करुन देशातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या रुग्णांना औषध पोहोचवली आहेत. ट्विटरवर आलेल्या ट्विटच्या माध्यमातून या नागरिकांनी मध्य रेल्वेला आपली औषधे पोहोचवण्यासाठी विनंती केली होती.