COVID-19 : ‘कोरोना’चा CRPF मध्ये पहिला बळी, 55 वर्षीय जवानाचा दिल्लीत मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसमुळे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाचा मंगळवारी मृत्यू झाला. सीआरपीएफच्या 55 वर्षीय जवानाला गेल्या आठवड्यात दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. सीआरपीएफच्या वतीने ही माहिती देण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत सुमारे दहा लाख कर्मचारी असणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (सीएपीएफ) कोविड – 19 या साथीच्या आजारामुळे हा पहिला मृत्यू आहे. मृत जवान सीआरपीएफमध्ये उपनिरीक्षक (एसआय) पदावर तैनात होते आणि संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एसआय आसामच्या बारपेटा जिल्ह्यातील रहिवासी होते आणि आधीच ते मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते.

दिल्लीतील केंद्रीय राखीव पोलिस दलातील बटालियनमध्ये तैनात असलेल्या 47 कर्मचार्‍यांपैकी 15 जवानांना कोविड – 19 संसर्ग झाल्याचे समजते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे सैनिक सीआरपीएफच्या 31 व्या बटालियनचे असून ज्यातील नऊ कर्मचारी गुरुवारी कोविड – 19 संक्रमित असल्याचे आढळले.

चाचणीसाठी 12 जवानांचे नमुने पाठविले
या अलीकडील घटनांसह, या युनिटमध्ये संक्रमित कर्मचार्‍यांची संख्या 24 झाली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, रूग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे आणि त्यांना मंडावली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या युनिटच्या आणखी 12 कर्मचार्‍यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा तपास अहवालाची प्रतीक्षा आहे.

सुट्टीसाठी नोएडा येथे आला होता तरुण :
गेल्या आठवड्यात बटालियनला जाणाऱ्या हेड कॉन्स्टेबलला कोविड- 19 संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर या तुकडीतील कर्मचार्‍यांची तपासणी केली गेली. हेड कॉन्स्टेबल नर्सिंग कामगार म्हणून कार्यरत आहे आणि जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे तैनात करण्यात आलेल्या 162 व्या बटालियनचा तो एक भाग आहे. तो सुट्टीच्या दिवशी नोएडा येथे आला होता. या जवानाला तपासणीसाठी 31 व्या बटालियनमध्ये जाण्यास सांगण्यात आले आणि 21 एप्रिल रोजी त्याचा कोविड -19 अहवाल पॉझिटिव्ह आला.