Coronavirus : केंद्र सरकार ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये, महाराष्ट्रात दिल्लीची 7 पथकं ‘तैनात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   विविध राज्यातील कोरोनाचा उद्रेक पाहाता आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 50 स्थानिक जिल्हा प्रशासन आणि महापालिकांच्या मदतीला केंद्राची उच्चस्तरीय पथकं तैनात करण्यात आली आहेत. कोरोनाचं व्यवस्थापन, कंटेन्मेंट धोरण यासाठी तांत्रिक मदत आणि इतर व्यवस्थापनासाठी या समित्यांकडून मदत केली जाणार आहे. या 50 ठिकाणच्या स्थानिक प्रशासनावर अत्यंत मोठा भार असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला.

महाराष्ट्रात 7 (जिल्हे आणि महापालिका), तामिळनाडू 7, राजस्थान 5, आसाम 6, तेलंगणा 4, हरयाणा 4, गुजरात 3, कर्नाटक 4, उत्तराखंड 3, मध्य प्रदेश 5, पश्चिम बंगाल 3, दिल्ली 3, बिहार 4, उत्तर प्रदेश 4 आणि ओडिशामध्ये 5 पथके तैनात करण्यात आली आहेत. या तीन जमांच्या प्रत्येक पथकामध्ये दोन तज्ज्ञ आणि एक वरिष्ठ संयुक्त सचिव यांचा समावेश असणार आहे. सचिव दर्जाचा अधिकारी प्रशासकीय व्यवस्था पुरवण्यासाठी नोडल अधिकारी असणार आहेत. तर केंद्राची पथकं प्रत्यक्ष काम करणार असून कोरोना सेंटरसारख्या विविध सुविधांच्या ठिकाणी भेटी देतील आणि नियोजनासाठी राज्याच्या आरोग्य विभागाला मदत करतील.

योग्य समन्वय, तातडीची कार्यवाही आणि खणखर धोरणासाठी जिल्हा प्रशासन किंवा महापालिकांना या पथकांच्या सातत्याने संपर्कात रहावं, असंही प्रस्तावित करण्यात आले आहे. कारण, या पथकांचा थेट राज्य सरकाराशी संपर्क असेल आणि त्यामुळे योग्य ते नियोजन होण्यास मदत होईल, असं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.

चाचण्यांमध्ये येणारे अडथळे, प्रति दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्या कमी होण्याचे प्रमाण, बाधितांचं उच्च प्रमाण, बेड्स व्यवस्थापन, मृत्यू दर रोखणे, रुग्ण संख्येचा अचानक उद्रेक अशा विविध गोष्टींवर केंद्राची पथकं काम करणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या पथकासोबत समन्वयासाठी एक जिल्हा स्तरावरील समितीही नियुक्त करण्यात आली आहे.