Pune : ‘सेंटर फॉर बायोफार्मा अ‍ॅनालिसिस’ प्रयोगशाळेची स्थापना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जैवतंत्रज्ञान विभागाच्या नॅशनल बायोफार्मा मिशनअंतर्गत औषध निर्मितीसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या रेणूंच्या आवश्यक चाचण्यांची सुविधा सेंटर फॉर बायोफार्मा अ‍ॅनालिसिस (सीबीए) ही अत्याधुनिक प्रयोगशाळा पुण्यात सुरु करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून राज्यभरातील औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधक, नवउद्यमी यांना चाचण्यांची सुविधा प्राप्त होईल.

केंद्र सरकार कडून बायोफार्मा मिशन अंतर्गत राज्यात ही पहिली प्रयोगशाळा सुरु करण्यात आली असल्याचे सांगत सेंटर फॉर बायोफार्मा अ‍ॅनालिसिसच्या डॉ. स्मिता काळे यांनी म्हटलं की, जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप यांच्या हस्ते नुकतेच या प्रयोगशाळेचे उदघाटन करण्यात आले. मोठ्या औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये चाचण्यांसाठी अशी सुविधा आहे. मात्र, सरकारच्या अनुदानातून स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेत चाचण्यांसाठीची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आतापर्यंत संशोधकांना त्यांच्या संशोधनाच्या चाचण्या परदेशातून करावे लागत असे. त्याकरता मोठा खर्च आणि वेळ ही वाया जात होता.

पण आता पुण्यातच ही प्रयोगशाळा सुरु झाल्याने कमी खर्चात आणि कमी वेळात चाचण्या करणे शक्य होईल. औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन होत असले, तरी चाचण्यांसाठीची आवश्यक प्रक्रिया होत नाही. म्हणून संशोधन पत्रिके व शोधनिबंध प्रसिद्ध करुन संशोधन तिथेच थांबते. परिणामी संशोधनाचे व्यवसायिकीकरण होऊ शकत नाही. तथापि, आता प्रयोगशाळेच्या माध्यमातून चाचण्यांची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने संशोधक, नवउद्यमी, उद्योगक्षेत्रातील कंपन्यांना परदेशातील चाचण्यांसाठी येणार खर्च कमी करुन चाचण्या करता येतील, असे डॉ. काळे म्हणाले. तसेच प्रयोगशाळेत एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

नवउद्यमींना संधी

औषधनिर्मिती, संबंधित संशोधन क्षेत्रात अद्याप नवउद्यमींचे प्रमाण कमी असले तरी या प्रयोगशाळेमुळे नवउद्यमींना अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, असे सुद्धा डॉ. काळे यांनी स्पष्ट केलं.