नवीन संसद भवनाचे काम थांबवा; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे नवीन संसद भवनाचे काम सुरु आहे. त्यावरून आता नवीन संसद भवनाचे काम थांबवावे, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

देशात कोरोनामुळे परिस्थिती बिकट असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे निवासस्थान आणि नवीन संसद भवानाचे काम जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हे काम थांबवावे, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे निवास्थान, एकाच ठिकाणी सर्व मंत्रालये, उपराष्ट्रपती निवास, एसपीजी मुख्यालय अशा सगळ्या इमारती या सेंट्रल विस्टा अंतर्गत उभारण्यात येणार आहेत. कोरोनाचा कहर कायम असल्यामुळे हे काम थांबवण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडून सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या कामाचे समर्थन करण्यात आले असून, हे काम कोरोना कर्फ्यू लागण्यापूर्वीच सुरू झाले आहे. या कामासाठी काम असलेले मजूरांची योग्य काळजी घेतली जात आहे. कामाच्या ठिकाणी आणि मजुरांच्या राहण्याच्या ठिकाणी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जात आहे.

याचिका फेटाळावी…

या प्रकल्पांचे काम करणाऱ्या मजुरांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. काम थांबवण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका खोट्या दाव्यांवर करण्यात आली आहे. न्यायालयाने ही याचिका फेटाळावी, असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले.