सरकारने जारी केली लसीकरण केंद्राची लिस्ट, ‘या’ सर्व रुग्णालयात दिली जाईल लस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना लसीकरण कार्यक्रम सुरु आहे. 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. आता या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीच्या दरम्यान केंद्र सरकारने रुग्णालयांची लिस्ट जारी केली आहे. त्यात लसीकरण मोहिमेच्या विस्तारासाठी खाजगी रुग्णालयांनाही या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सुमारे 10 हजार खासगी रुग्णालये आणि 600 सीजीएचएस रुग्णालये पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. याशिवाय जर राज्यांना हवे असेल तर त्यांच्या आरोग्य योजनेनुसार ते इतर खासगी रुग्णालये देखील जोडू शकतात. शासनाने आयुष्मान भारत योजनेंतर्गत पॅनेलमध्ये समाविष्ट केलेल्या रुग्णालयांची यादी खालीलप्रमाणे :
https://pmjay.gov.in/covid-vaccination-hospitals

दरम्यान, 1 मार्चपासून लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तसेच दुसऱ्या आजाराने ग्रस्त 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सरकारी केंद्रांवर अँटी -कोरोना विषाणूची लस मोफत दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना यासाठी खासगी दवाखाने आणि केंद्रांवर पैसे द्यावे लागतील. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी सांगितले होते की, या वर्गातील लोकांना 10,000 शासकीय केंद्रांवर मोफत लस दिली जाईल. तर 20 हजार खासगी दवाखाने किंवा केंद्रांवर लस घेताना पैसे मोजावे लागणार आहेत. ते म्हणाले की, भारत सरकार शासकीय केंद्रांवर मोफत लस देण्यासाठी आवश्यक पूरक वस्तू खरेदी करेल व त्या राज्यांना उपलब्ध करुन देईल.

दरम्यान, कोरोना लसीच्या निवडीबाबत विचारले असता केंद्रीय मंत्री म्हणाले, “भारताने दोन लसींना मान्यता दिली असून दोन्ही लस प्रभावी आहेत आणि त्यांची संभाव्यता सिद्ध झाली आहे.” या लसीकरण कार्यक्रमात आतापर्यंत 1,07,67,000 लोकांना लस देण्यात आली असून 14 लाख लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.