Coronavirus : मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी मोदी सरकारकडून हेल्पलाईन सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 42 लाखाच्या वर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात 90 हजाराच्या वर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. गेल्या 24 तासात यामध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासात 75809 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 1133 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 72775 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरना लढ्यात मोदी सरकारने पुढाकार घेतला आहे.

देशात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक लोकांचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. अशातच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मोदी सरकारने मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी 24 x 7 हेल्पलाईन सुरु केली आहे. सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी सोमवारी 24 x 7 टोल फ्री मानसिक आरोग्य हेल्पलाईन ‘किरण’ सुरु केली आहे. 1800-500-0019 हा हेल्पलाईन नंबर आहे.

कोरोनाच्या लढ्यात आशेचा ‘किरण’

कोरोनाचं महाभयंकर संकट असताना लोकांच्या मनात असणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, त्यांचे योग्य पद्धतीने समुपदेशन करणं हा या हेल्पलाईनमागचा प्रमुख उद्देश आहे. स्क्रीनिंग, प्रथोमोपचार, मानसिक स्वास्थ, सकारात्मक विचार आणि मानसिक आरोग्य कशा पद्धतीने उत्तम राखायचं याबाबत याठिकाणी सल्ला देण्यात येणार आहे. लोकांचे समुपदेशन केले जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.