‘ओला-उबर’ची 3 पट ‘चार्जेस’ वाढविण्याची तयारी, दैनंदिन जीवनावर ‘परिणाम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑटो सेक्टरमधील मंदी ही ‘ओला’ आणि ‘उबेर’ सारख्या भाडे तत्वावर मिळणाऱ्या कारमुळे असल्याचे वक्तव्य केले होते आणि यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांच्यावर चांगलीच टीका केली होती मात्र आता सरकार ओला, उबेर सारख्या कंपन्यांना तीन पट भाडे वाढवण्याची परवानगी देणार असल्याचे समजते.

‘पीक आवर्स’च्या वेळेस द्यावे लागणार जास्त भाडे
पीक आवर्सच्या वेळेस म्हणजेच ज्या वेळी मागणी जास्त प्रमाणात असते अशा वेळेस भाडे वाढवण्याची शक्यता या कंपन्यांकडून वर्तवली जात आहे. वृत्तानुसार कॅब अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांसाठी नवीन नियम बनवले जात आहेत. दुसरीकडे, ओला आणि उबेर सारख्या कंपन्या मागणी आणि पुरवठा संतुलित करण्यासाठी सुरुवातीपासूनच वाढीव किंमतीची मागणी करत आहेत.

नवीन मोटार नियमांचाही विचार
सुधारित मोटार वाहन कायदा मंजूर झाल्यानंतर कॅब मालकांबाबतही नवीन नियम आणले जात आहेत. त्याचबरोबर,नवीन नियम देशभरात लागू होतील, परंतु ते बदलण्याचा अधिकार राज्यांना असेल.

कर्नाटकाने केले आहे कंट्रोल
कर्नाटक राज्याने ओला, उबेर सारख्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवलेले आहे. राज्य सरकारने कंपनीने दिलेल्या गाड्यांच्या हिशोबाने त्याना भाडे आकारण्याची परवानगी दिली आहे आणि याचे सर्व नियम राज्य सरकारने आपल्या नियंत्रणात ठेवले आहे.

दिल्लीत पुन्हा सुरु होणार ऑड आणि इव्हन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत ऑड आणि इव्हन सुरु केले आहे. यात ओला उबेर सारख्या टॅक्सींचाही समावेश करण्यात आला आहे. या आधी जेव्हा ही प्रणाली सुरु करण्यात आली होती तेव्हा कंपन्यांनी खूप जास्त भाडे वसूल केले होते. मात्र त्यानंतर दिल्ली सरकारने यावर कडक कारवाई करत हे बंद केले होते. मात्र गेल्या वर्षी असे पुन्हा होणार नाही असे कार कंपन्यांनी आश्वस्त केले होते.