वाहनाचा क्रमांक मोबाईल क्रमांकाशी लिंक करणं होऊ शकतं बंधनकारक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लवकरच आपल्याला वाहन नोंदणी क्रमांक आपल्या मोबाईल क्रमांकाशी लिंक करावा लागणार आहे. याविषयी केंद्र सरकार ठोस धोरण आखत आहे. रस्ते आणि परिवहन मंत्रालय 30 दिवसांच्या आत अधिसूचना जारी करू शकते. हा नियम 1 एप्रिल 2020 पर्यंत देशभर लागू होईल.

रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन नियमामुळे वाहनाशी संबंधित सर्व सुविधांची माहिती मिळू शकेल. त्याअंतर्गत फिटनेस, विमा, प्रदूषण इत्यादींची मुदत संपण्यापूर्वी मोबाईलवर वाहन मालकाला मेसेज देण्यात येईल. यासह ई-चलन माहितीही मिळणार आहे. तसेच, कार मालकांच्या प्रवासाविषयी माहिती मिळणे शक्य होईल. यामुळे कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्‍या एजन्सींना मदत मिळेल.

मोबाईल क्रमांक वाहन नोंदणी क्रमांकाशी लिंक न झाल्यामुळे वाहन मालकांना वाहनाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे अपडेट मिळत नाहीत. तसेच ई-चलन कापल्यास ई-चलनचा मेसेजही मिळत नाही. असे बरेच वाहन मालक आहेत ज्यांचा मोबाइल क्रमांक जुना आहे आणि ते वापरात नाहीत, त्यांच्यासाठी परिवहन विभागाने त्यांना ही सुविधा दिली आहे. वाहनमालक वेबसाइटवर आपला मोबाइल क्रमांक सहजपणे अपडेट करू शकतील.

1 सप्टेंबरपासून देशात नवीन मोटार वाहन कायदा अस्तित्वात आला आहे. यासह ड्रायव्हिंग लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्र संबंधित नवीन नियमांतर्गत बदल करण्यात येत आहेत. नव्या नियमांतर्गत आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र मोबाइल क्रमांकावर जोडणे बंधनकारक असेल. ड्रायव्हिंग परवान्याशी मोबाइल क्रमांक जोडण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, एखादा अपघात झाल्यास, ड्रायव्हिंग लायसन्सवर दिलेलाक्रमांक वापरुन अपघात झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाकडे मदतीसाठी संपर्क साधता येतो. उत्तर प्रदेश हे पहिले राज्य आहे जिथे 1 ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानंतर या ड्रायव्हिंग लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्रात मोबाइल क्रमांक जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.