India China FaceOff : मोदी सरकार चीनला मोठा झटका देणार ? 1172 वस्तूंची नवी यादी तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनदरम्यान झालेल्या हिंसक चकमकीमुळे दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. ज्यानंतर देशभरातून चीनविरोधात संताप लाट उसळली आहे. देशात मोठ्या संख्येने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जात आहे. यासाठी अतिशय स्वस्त वस्तूंची यादी पूर्ण झाल्यानंतर आता केंद्र सरकारनं ‘मेड इन चायना’ अर्थातच चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंची यादी तयार केली आहे. ज्यात बॅटरी, मोटारींचे सुटे भाग, इलेक्ट्रिक यंत्रसामग्री तसेच औद्योगिक यंत्रांचदेखील समावेश आहे.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं (डीपीआयआयटी) तयार केलेल्या दुसऱ्या यादीत चीनमधून आयात होणाऱ्या १,१७२ वस्तूंचा समावेश आहे. डीपीआयआयटीनं तयार केलेल्या यादीत टोस्टर्स, फ्रीज, एसी, कॉफी मेकर्स, मायक्रोव्हेव ओव्हन, शेवर्स, कटलरी, शिलाई मशीनचा समावेश आहे. याशिवाय डीपीआयआयटी अनेक इलेक्ट्रिक उपकरणांवर अधिकचा आयात कर लादण्याचा विचारात असल्याचे समजते. यामध्ये सर्किट ब्रेकर्स, उच्च क्षमतेचे स्विच, रेसिस्टर्स, जनरेटर्स आणि डीसी मोटर्सचा समावेश आहे. या यादीमध्ये इलिव्हेटर्स, रोलर बेअरिंग्ज, व्हॉल्व्स, खाद्य प्रक्रिया करणारी यंत्रं आणि कोळसा हाताळणाऱ्या यंत्रांचा समावेश आहे. दरम्यान, चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या टोस्टर्ससारख्या उपकरणांना सरकारनं तयार केलेल्या यादीचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचे समजते.

दरम्यान, १५ जून रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन दरम्यान हिंसक झटापट झाली. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर संपूर्ण देशात चीनविरोधात संतापाची लाट असून चीनमधून वस्तूंहूची आयात थांबवावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. माहितीनुसार, दरवर्षी चीनमधून ७४ बिलीयन अमेरिकन डॉलरचं सामान भारतात आयात केलं जात.