रेल्वेमुळे तब्बल 35 लाख कामगारांची झाली घरवापसी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यात अडकलेल्या मजूरांना मूळगावी पाठविण्यासाठी रेल्वेने भार उचलल आहे. मजुरांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वेने 1 मेपासून विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत.

त्याचा फायदा मुख्यतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये घर असलेल्या स्थलांतरित कामगारांनी घेतला आहे. त्यामुळे तब्बल 35 लाख लोक आपापल्या घरी पोचू शकले आहे. त्यापैकी 28 लाख लोक उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पोहोचले आहेत, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी दिली.

परराज्यात अडकलेल्या मजूरांना घरी सोडण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या. तेव्हापासून 2 हजार 600 फेर्‍या झाल्या असून 35 लाख कामगार गावी पोहोचले. पुढच्या 10 दिवसांत आणखी 2 हजार 600 गाड्या सोडण्यात येणार असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. राज्याने मागणी केल्यास त्या राज्यासाठीही रेल्वे सोडण्याचा विचार करण्यात येईल, असेही यादव यांनी सांगितले आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. श्रमिक ट्रेनने प्रवास करणार्‍या सर्वांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे बंधनकारक आहे. रेल्वे स्टेशनवर सगळ्यांची तपासणी करण्यात येत असून आजाराची लक्षणे नसणार्‍यांनाच प्रवासाची अनुमती देण्यात येत आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून 1 जूनपासून आणखी 200 मेल एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यात येतील, अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली. रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाची सुरुवात 21 मे पासून सुरू झालेली आहे.