सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी : स्वस्त झाली तुर आणि उडीद डाळ

नवी दिल्ली : कोविड-19 च्या लॉकडाऊनमुळे अगोदरच डबघाईला आलेली देशाची अर्थव्यवस्था आणखीच खिळखिळी झाली आहे. अशातच महागाईनी उच्चांक गाठला आहे. अन्न, धान्याचे भाव वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशावरील ओझे वाढत आहे. लॉकडाऊननंतर धान्य, डाळी आणि तेलाचे दर वेगाने वाढत आहेत. अशावेळी लोकांना थोडा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकार डाळींच्या किरकोळ किंमती कमी करणे, आणि ग्राहकांना लाभ देण्याच्या हेतूने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ठरलेल्या भावात डाळ पुरवणार आहे.

लोकांना दिलासा देण्यासाठी निर्णय
सरकारच्या निर्णयानंतर खरीफ-18 व्हरायटीच्या उडीद डाळीची किंमत 79 रुपये प्रति किलोग्रॅम आणि खरीफ-19 व्हरायटीच्या उडीद डाळीचा दर 81 रुपये प्रति किलोग्रॅम असेल. तर तुरडाळ 85 रुपये प्रति किलोग्रॅममध्ये मिळेल. तुरडाळीचे दर मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी 85 ते 95 रुपये होते, परंतु आता ते प्रचंड वाढून 135 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. मुगडाळ आणि मसूरच्या किंमतीही वाढलेल्या आहेत.

सरकारी वक्तव्यानुसार, केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना हा प्रस्ताव दिला आहे की, त्यांनी आवश्यकतेच्या आधारावर स्टॉक 500 ग्रॅम आणि 1 किलोच्या किरकोळ पॅकमध्ये डाळी वितरीत कराव्यात. ग्राहक मंत्रालयाच्या मंत्र्यांनी म्हटले की, ग्राहकांच्या हितासाठी तुरडाळ आणि उडीद डाळीच्या किरकोळ किमतीमधील वाढ कमी करणे आणि डाळींचा पुरवठा वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.