प्रायव्हसी पॉलिसीतील बदल मागे घ्या; केंद्र सरकारचं थेट WhatsApp च्या CEO यांना पत्र

पोलिसनामा ऑनलाईन टीम : व्हॉट्स ॲपनं प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सॲपच्या या नव्या धोरणामुळे गोपनीयतेला धोका येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबद्दल व्हॉट्स ॲपनं स्पष्टीकरण दिल्यानंतर लोकांच्या मनातील संभ्रम कायम आहे. व्हॉट्स ॲपच्या प्रस्तावित प्रायव्हसी पॉलिसीबद्दल केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं व्हॉट्सॲपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल कॅथकार्ट यांना पत्र लिहिलं आहे. व्हॉट्स ॲपचे सर्वाधिक वापरकर्ते भारतात आहेत. त्यामुळे व्हॉट्स ॲप सुविधेसाठी भारत मोठी बाजारपेठ असल्याचं मंत्रालयानं पत्रात नमूद केलं आहे. तर दुसरीकडे नव्या धोरणाला मान्यता देण्यासाठीची मुदत व्हॉट्स ॲपनं वाढवली आहे. ही मुदत ८ फेब्रुवारीला संपेल. मात्र आता भारत सरकारनं थेट व्हॉट्स ॲपच्या सीईओंना पत्र लिहिलं आहे. गोपनीयतेच्या धोरणातील नवे बदल मागे घ्या, अशी स्पष्ट मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

भारतीयांचा योग्य आदर व्हायला हवा. व्हॉट्स ॲपकडून गोपनीयतेच्या धोरणात एकतर्फी करण्यात आलेले बदल स्वीकारार्ह नसतील, असं केंद्रानं सीईओ कॅथकार्ट यांना सुनावलं आहे. व्हॉट्स ॲप करू पाहत असलेल्या बदलांमुळे भारतीय नागरिकांची गोपनीयता धोक्यात येईल. त्यामुळे नागरिकांच्या माहितीची गोपनीयता जपण्यासाठी, निवडीचं स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी प्रस्तावित बदल मागे घ्या, अशी मागणी केंद्र सरकारनं केली आहे.