दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार आहे. सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली. पण या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. एका पोलीस अधिकाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आले. तसेच पोलिसांचे शस्त्रही हिसकावण्यात आली. दिल्लीत लाल किल्ल्यावर झेंडा देखील फडकवण्यात आला. महिला पोलिसांवर देखील हल्ले करण्यात आले. यामुळे दिल्लीतील वातावरण चांगलंच गरम झाले आहे. या सर्व परिस्थिच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला.

दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. मात्र आजची स्थिती पाहता सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. पंजाब, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. पण सरकारने त्यांना गांभीर्याने घेतलं नाही. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम संपला आणि ते दिल्लीत दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढला. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरले, असे शरद पवार म्हणाले.

दिल्लीत जी काही हिंसा झाली त्याचे समर्थन कुणीही करणार नाही. पण त्यामागचे कारण दुर्लक्ष करुन चालणार नाही. आंदोलन करणारे शेतकरी भडकले आहेत. कारण केंद्र सरकारने आपली जबाबदारी पार पाडलेली नाही. सरकारने प्रगल्भतेने आणि योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.