आंदोलकांची कर्जत नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यास धक्काबुक्की

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – तौसिफ शेख यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कर्जतमध्ये आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी संतप्त जमावाने कर्जत नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत  परिस्थिती नियंत्रणात आणून बंदोबस्तात त्यांना कार्यालयाबाहेर नेले.
हिरे दावल मालिक येथील अतिक्रमण काढण्यात कर्जत नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांनी दिरंगाई केल्याचा आरोप करीत आंदोलन अधिक आक्रमक झाले. जमावाने मुख्याधिकारी साजिद पुजारी यांना धक्काबुक्की करीत नगरपंचायत कार्यालयावर जोरदार दगडफेक केली. परंतु, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. शेख यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आज कर्जत मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

 

दुसरीकडे नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास ३ जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. शेख मुत्यूप्रकरणी कर्जतचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार, प्रांताधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. याबाबतचे लेखी निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे देण्यात आले. पोलिस अधीक्षकांनाही मुस्लिम समाजाच्यावतीन निवेदन देण्यात आला. कर्जत घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाभरात प्रशासकीय यंत्रणेवर टीका होत आहे.