सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. जाहिर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार इंजिनीअरिंग आणि फार्समी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा २ ते १३ मे दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखांची पूर्वकल्पना येऊन परीक्षेची तयारी करत येण्यासाठी सीईटी सेलकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. यंदा प्रथमच या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या धर्तीवर सीईटी सेलकडून काही महिन्यांपूर्वीच प्रवेश परीक्षेचे तारखा जाहीर केल्या जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे. सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सीईटी सेलद्वारे एमबीए, एमसीए, तीन व पाचवर्षीय विधी (लॉ), पदवी व पदव्युत्तर इंजिनीअरिंग, फार्मसी, फाइन आर्ट, पदवी व पदव्युत्तर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, आर्किटेक्‍चर, बीपीएड, एमपीएड, बीएड, एमएड, बीए व बीएस्सी इंटिग्रेटेड कोर्स या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी होणार आहेत.

या विविध सीईटींसाठी कोणत्या तारखेला अर्ज करायचे, त्याची सविस्तर माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. या संपूर्ण परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य सीईटी सेलच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षांच्या काही तारखांमध्ये बदल होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, अशी माहिती सीईटी सेलच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परीक्षांची अद्ययावत अधिक माहिती विद्यार्थी-पालकांनी वेबसाईटवर मिळणार आहे, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

प्रमुख अभ्यासक्रमांच्या सीईटी

एमबीए : ९ व १० मार्च, एमसीए : २३ मार्च, एलएलबी (५ वर्षे ) : २१ एप्रिल, इंजिनीअरिंग, फार्मसी : २ ते १३ मे, एलएलबी (३ वर्षे ) : ११ मे, आर्किटेक्चर (बीआर्च) : १८ मे, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स : १९ व २०मे, बीएड-एमएड : २२ मे,