नोटाबंदीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत आले : भुजबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नोटबंदीच्या निर्णयापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत अपयश येत आहे. मेक इन इंडिया, डिजीटल इंडिया आणि स्मार्ट सीटी आदींमध्ये मोदींना आलेले अपयश हे आता त्यांची पाठ सोडायला तयार नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

भुजबळ म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचा निवडणुकीपूर्वी १५ लाख देशातील प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा करण्याचा वादा हा जुमला निघाला. त्यानंतरही आता ४ वर्षांत ४ स्मार्ट सिटी, बेरोजगारी नष्ट झालेले ४ जिल्हे, भ्रष्टाचार नाही असे, प्रत्येकांना घर मिळाले असे देशातील ४ जिल्हे तरी या सरकारला दाखवता येतील का? आता या लोकांनी केलेल्या भानगडी सीबीआयसारख्या संस्थातून बाहेर येत असून हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून लोक पळून गेले, म्हणूनच त्यांना कोणीही पकडू शकले नाही, केवळ यांचे हे घपलेच नाहीत तर घटना न बदलता ते सर्व काही बदलत सुटले आहेत. त्यामुळे आता शांत बसून चालणार नाही, असेही भुजबळ म्हणाले.

राज्यातील बहुजन समाजाने आपले मतभेद विसरून एकत्र यावे आणि केंद्रातील राज्यातील भाजपाचे सरकार उलथून टाकावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. त्यासोबतच बहुजनांनी आता आपला शत्रू ओळखावा आणि त्याविरोधात संघर्ष करण्यासाठी वेळीच समोर यावे असेही भुजबळ म्हणाले. यावेळी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी म्हणाले की, आज राज्यात बहुजनांची गळचेपी होतेय, नेते संपवले जात आहेत. संविधान नष्ट केले जात आहे, प्रत्येक खात्यात संघाचा माणूस बसला आहे, त्यामुळे आपल्या संघर्ष करण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे.